Tuesday, August 2, 2011

पुन्हा भेटूच

नमस्कार
ब-याच दिवसांनी इथे फिरकले आहे। दोन ब्लॉग साम्भाळणं जरा जड़ जात होत। म्हणून ते एकातच merge केले। ही माझी या ब्लोग्वाराची शेवटची पोस्ट। तुम्हाला सगळयाना पुन्हा भेटायला नक्कीच आवडेल। माझ्या दुस-या ब्लोगवर आता नियमित हजेरी लावत जा हे आग्रहाच आमंत्रण । पत्ता असा:
://sonalwaikul.wordpress .com
भेटूच.

Wednesday, May 19, 2010

अस्तित्व

कोटी कोटी आकाशगंगेतल्या
असंख्य सुर्यांपैकी कोण एका सूर्याच्या मेहेरबानी वर तगलेल्या
एका खड्याच्या पाठीवर
रांगणा-या असंख्य जीवांपैकी एक सूक्ष्म मासाचा गोळा।
हेच अस्तित्व.

त्याचं जगण मरणं वगैरे गोष्टी दैनंदिनीचा भाग एक!

बाकी तुझा खरा जन्म आणि मरण दोन्ही होत असत खोल खोल आत
फक्त तुझ्या मनात; फक्त तुझ्या मनापुरतच।

एरवी तू नसल्याशिवाय तुझ्या असण्याची तरी जाणिव कुठे असते;
ना त्या खड्याला, ना त्या सूर्याला,
पण तुझ्या खिडकीतलं रोप मात्र शोधत तुला रोज;
सूर्य त्याची तहान नाही भागवू शकत।

Tuesday, April 6, 2010

कपडे


अंधा-या खोलीतलं जुन कपाट ब-याच वर्षांनी उघडलं
तसे आतले अस्ताव्यस्त कपडे अनावर होत कोसळले।

नकोसे झालेले डांबून ठेवलेले
वातड, खरखरीत, चुरगळलेले
कसर लागून कुरतडलेले,
जुनाट कुबट भपका-याने गुदमरून टाकणारे…

तेव्हापासून ठरवलंय,
आता आठवणींना असं कोंडायचं नाही॥

Wednesday, March 24, 2010

पुरावा

ऐकत रहा, बोलत रहा
वेळोवेळी भेटत रहा
तुझ्या असण्याच्या खुणा मला
जागोजागी पटवत रहा

तुझ्यापर्यंत पोचण्याची वाट
इतकी सुद्धा बिकट करू नकोस, की
त्या तीरावर तू आहेस हा विश्वास संपून जाईल
कारण,

कारण मी जरी तुझी निर्मिती असलो तरी
तुझ्या अस्तित्वाचा देखील एकमेव पुरावा मीच आहे
हे विसरू नकोस…

Friday, February 19, 2010

अंधार

दिवस आणतो बापाची माया शिस्तीची लय
अंधार म्हणजे दिवसाची छाया आईची सय

हसर्या जखमा बिनदिक्कत भळभळणार्या
मुक्या वेदना मुक्त मोकळ्या कळवळणार्या
काळ्या शाईत विरघळणारे खारट पाणी
बुजर्या स्पर्शामधून फुलती प्रेम निशाणी
काळोखाच्या पदरामागे दिवाभितांना आश्रय, अवसर
कुठे बंद डोळ्यातून वाहती चिंता आशा स्वप्न निरंतर
लपती चिंध्या, लपती ठिगळे;
काळे गोरे समान सगळे,
अंधाराच्या मिठीत अवघे मिटले अंतर
पूर्व दिशेला पुन्हा उलगडे सोनसळी पट, सुंदर सुंदर…

Friday, January 29, 2010

गंगा

धुराबरोबर विरत जातात
राग लोभ, चिंता क्लेश
राखेबरोबर विखरत राहतात
अस्तित्वाचे भग्न अवशेष

तेहि घेते भरून मडक्यात
जीवनाची आसक्ती
शोधत राहते गंगाजळात
मुक्तीची
शाश्वती

ओझे वाहत निर्माल्यांचे
अन अस्थिंची अर्चना
तिचा आत्मा करतो आहे
मुक्तीची प्रार्थना

Thursday, January 14, 2010

blogs चं शुभ मंगल.

अभिनन्दन, सोनल. दोन्ही ब्लॉग एकरूप केल्याबद्दल, तेही मकर संक्रांतीच्या दिवशी!

खर म्हणजे मी blogspot वरून सुरवात केली. तेव्हा जे काही सुचायचं ते इथे टाकायचे. योगायोगाने कविता जास्त सुचत गेल्या. म्हणून विचार केला कि हा ब्लॉग फक्त कवितांचा असावा. म्हणून मग wordpress ब्लॉग सुरु केला, कविता सोडून बाकी वाट्टेल ते लिहिण्यासाठी.
नंतर जाणवलं कि दोन्हीचे काही वाचक सारखे आहेत आणि काही वेगळे. मग जेव्हा एखादी post सगळ्यांना दाखवावीशी वाटायची तेव्हा दोन्हीकडे टाकायला लागले. झाल म्हणजे. पहिले पाढे पंचावन्न.
म्हणून हा Blog -mixing excercise . आता sonalwaikul .wordpress या ब्लॉगवर सगळ publish करणार. जे सुचेल ते. वाचकांना देखील सोयीच. आणि मला देखील.
Ofcourse blogspot च्या followers साठी माझ्या कविता publish करेनच.

छे छे हे परत complicate होतंय. श्या ssss . पण कळलं न तुम्हाला आता मला काय म्हणायचय ते?