Friday, February 19, 2010

अंधार

दिवस आणतो बापाची माया शिस्तीची लय
अंधार म्हणजे दिवसाची छाया आईची सय

हसर्या जखमा बिनदिक्कत भळभळणार्या
मुक्या वेदना मुक्त मोकळ्या कळवळणार्या
काळ्या शाईत विरघळणारे खारट पाणी
बुजर्या स्पर्शामधून फुलती प्रेम निशाणी
काळोखाच्या पदरामागे दिवाभितांना आश्रय, अवसर
कुठे बंद डोळ्यातून वाहती चिंता आशा स्वप्न निरंतर
लपती चिंध्या, लपती ठिगळे;
काळे गोरे समान सगळे,
अंधाराच्या मिठीत अवघे मिटले अंतर
पूर्व दिशेला पुन्हा उलगडे सोनसळी पट, सुंदर सुंदर…

No comments: