Showing posts with label मुक्तछंद. Show all posts
Showing posts with label मुक्तछंद. Show all posts

Monday, January 11, 2010

खूण

तुला आवडते प्रत्येक गोष्ट अगदी जागच्या जागी, नीटनेटकी.
मला मात्र आवडतात खुणा कोणीतरी हक्काने येवून गेल्याच्या,
जागोजागी विखुरलेल्या.

ओल्या आरस्पानी फरशीवर पावलं उमटलेली तुला कधीच आवडत नाहीत.
मी मात्र मागोवा घेत जाते पाउलखुणांचा.
या घरात माणसं देखील आली असतील या आशेवर!

तुला नाही सहन होत एकही चुणी त्या कडक इस्त्री केलेल्या कपड्यावरची
मला मात्र बर वाटत ती चुणी बघताना
दिसते त्यात खूण...निदान काहीतरी तुला स्पर्शून गेल्याची।

असा कसा झालास रे तू?
की असाच होतास?
आईच्या पोटात सुद्धा पद्मासन घालून बसलेला!

कधी कळणार तुला,
विस्कटलेल्या प्रत्येक गोष्टीला गंध असतो श्वासाचा,
स्पर्श असतो हाताचा
म्हणूनच आवरलेल घर पसरल्यावर, तू जेव्हा विस्कटतोस
तेव्हा मला खूप आवडतोस.
मला पटते खूण मी माणसावरच प्रेम केल्याची।

Friday, October 16, 2009

ओळख

ओळखीच्या वाटेवरून इतक्या वर्षांनी चालताना
अनोळखी दिसलं बरच काही.
अनोळखी होतं मला सुद्धा हे असं अपराधी वाटणं
कधी काळी मित्र असलेल्या या सगळ्या खुणांना नव्याने भेटणं.
डोळ्यात त्यांच्या बरच काही लपलेलं
काहीस माझ्यातल खुपलेलं आणि बरच काही आमच्यामधलं जपलेलं

सगळेच असे अंतर राखून अवघडलेले असताना तो दगड मात्र थेट पायात घुसला.
कच्चकन एक शिवी हासडून पाहिल तेव्हा हीही ओळख जुनीच निघाली

याच वाटेने शाळेत जाताना यालाच रोज नेमाने भिरकावून द्यायचो उंच
तो चाखायाचा चव आभाळाची आणि माझ्या जिभेवर रेंगाळायची आंबट गोड चिंच.

माझ्या शिवीवर त्यानेही ऐकवली एक भारीतली ओवी.
माझा चेहरा कळ्वळलेला,
त्याचाही हळहळलेला
“रोज नव्या आभाळात उडायला लागल्यावर विसरलास मला लेका?”
भिराकाव ना मला पुन्हा एकदा उंच!

बरेच दिवस झाले तुला सुद्धा चिंचा खावून…”

Friday, September 11, 2009

बरसणं तसं सोप्प नसतच

ही कविता, काही झोकुन देणार्या आधुनिक संतांना पाहून स्फुरलेली!
--------------------------------------------------------------------
एक ढग सारखा सारखा दाटून यायचा पण बरसायला मात्र घाबरायचा
बरसणं तसं सोप्प नसतच, महित्येय मला.

ते म्हणजे फ़क्त पडणं नसतं,
ते म्हणजे घडण असतं
आभाळाच्या हृदयातून
मातीच्या गर्भात शिरणं असतं
पुन्हा उगवून पोटातून
कणाकणात झरणं असतं

वाटेवरती भेटत जातात काही कोम्ब निजलेले
दगड गोटे सुक्या फांद्या काही ओन्डके थिजलेले
सगळ्याना भिजवत जायचं,
जमलं तर रुजवत जायचं

कोम्बातून फुटून हिरवा होतो ढग जेव्हा
दगडाला पाझर फोडत सागर होतो ढग जेव्हा...
कोसळण्याची भीती नसतेच,प्रश्न असतो अस्तित्वाचा.
ढग जेव्हा पाणी होतो, तो ढग म्हणुन उरतोच केव्हा?

असेच ढग जास्त असतात तुमच्या आमच्यात, नुसतेच फ़क्त दाटणारे
सोनेरी कडा मिरवत कापूस पिंजत बसणारे
अस्तित्वाचा काळा कापूस शोषून घेतो पाणी सारे
उरतात मागे काही थेम्ब आणि थोड़े षन्ढ उमाळे

कोसळणारे ढग तेव्हा काळी ढेकळं शिम्पत असतात
सुकलेली तापलेली कोरडी मने लिम्पत असतात
पुन्हा हवेत विरत जातात, पुन्हा पुन्हा दाटत राहतात
अस्तित्वाच्या प्रवासाला पुन्हा पुन्हा भेटत राहतात...

म्हणुन म्हटलं, बरसणं तसं सोप्प नसतच, महित्येय मला