Thursday, November 19, 2009

प्रिय आईबाबांस...

उद्या माझ्या आईची एकसष्ठी आणि बाबांची सत्तरी. त्या निमित्ताने काहीतरी लिहिण्याचा विचार होता. पण लिहायला बसलं की फक्त गहीवरच येतो. डोळ्यातलं पाणी थांबवता थांबवता काहीतरी सुचलेलं लिहितेय. हे फक्त तुमच्यासाठी आई-बाबा...

________________________________________________________________________________

साठी सत्तरी सगळेच करतात; त्यात काय वेगळ आहे?
तेच जेवण, तशीच माणसे, तेच तेच सगळ आहे...

तरीसुद्धा वेगळ आहे खूप काही
सगळंच कदाचित मला सांगताही येणार नाही, पण...

वेगळी आहे विण आपल्या नात्यातली; आमच्या लांब घट्ट वेण्यांसारखी
वेगळी आहे ठेव आपल्या खात्यातली, तुमच्या बँकेतल्या खणखणीत नाण्यासारखी.
वेगळी आहे माया तुम्ही आमच्यावर लोटलेली,
वेगळी आहे काळजी तुमच्या चार डोळ्यात साठलेली,
वेगळा आहे तुम्ही दिलेला संस्कारांचा वसा,
आमच्या अवघ्या अस्तित्वावर तुमच्या प्रेमाचा ठसा.

'लहान आहोत का आम्ही आता' अस म्हणत आम्ही जेव्हा भांडतो,
तेव्हा
'लहान का नाहीयोत आम्ही अजून?' असंच म्हणायचं असत.
सगळ सोडून धावत धावत बालपणात जायचं असत.

हवा असतो हात तुमचा थकून डोळे मिटताना
खायचा असतो ओरडा थोडा अंथरुणात लोळताना.

भान हरपून खेळतानाही तुमचीच वाट बघायची असते
पिशवीतला खाऊ खाता खाता गणिताची वही दाखवायची असते...

तुमच बोट धरून तुम्हाला मागे न्यावं खेचत खेचत
फिरत राहावं गेल्या दिवसांत माणिक मोती वेचत वेचत

आजच्या दिवशी देवाजवळ मला इतकंच मागायचय
तुमच्याच पोटी येवून पुढचे शंभर जन्म जगायचय
पुढच्या वेळी एक फरक नक्की कर मात्र, देवा
मन दे सायीचच पण देह मात्र मुलाचा हवा.
का म्हणून विचारू नकोस कारण तुला ते कधीच कळणार नाही
आणि आमच्या सत्तरीला सुद्धा आमची माहेराची ओढ काही सरणार नाही.

4 comments:

Nikhil said...

फारच सुंदर लिहिलीय कविता .....
अगदी लहानपणीचे दिवस डोळ्यासमोर आले .....
आपण नेहमीच आपल्या आई बाबांना Taken for granted घेतो

Yogesh said...

ya agodar ek kavita tu tuzya muli sathi lihilelis aani hi tuzya aai babansathi .... mala hech vatat ki ya kavita mhannya peksha mi bhavna mhnun jast ghein ... ya likhanavar comments deu shaknar nahi ...

Mi, Sonal said...

:) khar aahe.

Madhurika said...

Tu evadhi sundar kavita lihili aahes te malaa maahitch navate.Malaa tuze ani Meenalche lahaanpan aathavale. Nusate aathavale naahi tar kahise gahivarlyasaarakhe zaale. Ha gahivar fakt maza nahi aahe fakt tuzahi naahiye. Pratyek mothya zalelya BALAACHYAA manaacha aahe. Ase lahan houn punha aapalyaach aai babanchya kusit janmala yaayche bhaagy tula nakki labho.MULAGA HOUN ATHAVAA MULAGI HOUN. Malaa khaatri aahe ki Maavshi-Kakana punha tula vaadhavaayala nakkich have asanaar aahe.